Land Records Department: पोस्टमन पत्र नव्हे नोटीस घेऊन येणार! तलाठ्यांचा भार कमी होणार , अभिलेख विभागाने घेतला मोठा निर्णय

Land Records Department:तलाठ्यांना कामाच्या व्यापामुळे नोटिसा वेळेत देणे शक्य होत नाही.यासाठी अभिलेख विभागाने नाेटिसा पोस्टाने पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संबंधितांच्या नावे ऑनलाइनद्वारे पोस्ट ऑफिसकडे नोटिसा जातील. नोटिसांची प्रिंट काढून संबंधितांच्या पत्त्यावर पोहोचविण्याचे काम पोस्ट ऑफिसच करणार आहे. हा प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प मुळशी तालुक्यात राबविण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने राज्यात राबविण्यात येणार आहे. (Pune Latest News)

गाव पातळीवर काम करणार्‍या तलाठ्याला निवडणुकांच्या मतदार याद्या, प्रोटोकॉल, पंचनामे यासारखी विविध कामे करावी लागतात. त्यामुळे विविध कामांच्या ओझ्याखाली तलाठी दबले आहेत. सातबारा बदलताना फेरफार घ्यावा लागतो. त्यासाठी जमीन खरेदी विक्री केलेल्यासह जागेलगतच्या नागरिकांना नोटिसा द्याव्या लागतात. त्यांच्या हरकती मागवाव्या लागतात. त्यासाठी नोटिसा वेळेत देणे आवश्यक असते. मात्र, तलाठ्यांकडून नोटिसा वेळेत दिल्या जात नसल्याचे दिसून आले आहे.

या पार्श्वभूमीवर, राज्याच्या भूमी अभिलेख विभागाकडून अन्य पर्यायांचा विचार सुरू होता. दरम्यान, पोस्ट ऑफिसच जमाबंदी आयुक्तालयात जाऊन धडकले आणि त्यांच्याकडून प्रस्ताव देण्यात आला. त्यानुसार, भूमी अभिलेख विभागाने तलाठ्यांवरील कामाचे ओझे कमी करण्याच्या हेतूने पोस्टाद्वारे थेट नोटिसा पाठविण्याचा निर्णय घेतला. ‘फेरफारसाठी रहिवाशांना नोटिसा देण्यासाठी तलाठ्याच्या ‘लॉग इन’ला संबधित नोटिसा ऑनलाइनद्वारे पोहोचत होत्या. संबंधित तलाठी त्याच्या प्रिंट काढून त्यावर संबंधितांचे नाव, गाव, पत्ते लिहून ते पोस्टात टाकत असे. मात्र अनेकदा त्या पत्त्यावर त्या नोटिसा पोहोचत नसत. नोटिसा मिळाल्या नसल्याच्या तक्रारीही येत आणि नोटिसा पाठविण्यास विलंबही होताे.

आता पोस्ट विभागाचे सहकार्य घेऊन फेरफारबाबत नोटिसा तयार होताच संगणकप्रणाली ऑनलाइनद्वारे थेट पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचतील. त्या नोटिसांची संबंधित पोस्ट ऑफिसमधील अधिकारी, कर्मचारी स्वतः प्रिंट काढतील. रेकॉर्डवर दिलेल्या संबंधितांच्या नाव, गाव, पत्यासह पाकिटावर तिकिटे लावून ते पोस्टमनमार्फत संबंधितांच्या घरी पाठवतील. त्यामुळे संबंधित त्या ठिकाणी राहतात की नाही किंवा त्यांना ती नोटीस मिळाली की नाही याचे रेकॉर्डही पोस्ट ऑफिसकडून अपडेट केले जाईल. त्यामुळे नोटिसा वेळेत पोहोचून कार्यवाही वेळेत करणे शक्य होणार आहे’, अशी माहिती माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संचालक अतिरिक्त जिल्हाधिकारी सरिता नरके यांनी दिली.

या बाबत पोस्ट ऑफिसकडूनच भूमी अभिलेख विभागाला विचारणा करण्यात आली होती, त्या नंतर नोटिसा देण्याचे काम पोस्ट ऑफिसला देण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला. या कामासाठी पोस्ट ऑफिसला भूमी अभिलेख विभागाकडून काही शुल्क देण्यात येणार आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिसलाही उत्पन्न मिळणार आहे. फेरफारसंदर्भातील ऑनलाइनद्वारे नोटिसा तयार होताच त्या आता तलाठ्याऐवजी पोस्ट ऑफिसला पोहोचतील. त्याचा प्रयोग मुळशी तालुक्यातील काही गावांमध्ये करण्यात येणार आहे. हा प्रायोगिक प्रकल्प लवकरच राबविण्यास सुरुवात होणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यभरात राबविण्याचा निर्णय घेण्यात येईल

तलाठ्यांवरील कामाचे ओझे कमी कऱण्यासाठी फेरफारसाठी नोटिसा पोस्ट ऑफिसमार्फत देण्याचा प्रयोग राबविण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास तो राज्यभरात राबविण्यात येणार आहे.

-डॉ. सुहास दिवसे, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख

Leave a Comment